1

!! वीरशैव कक्कय्या ढोर समाज या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत !!

3

१)मा.श्री.रमाकांत नारायणेसाहेब.(एस.इ).रहिमतपूर संपर्क-९९८७८९२०६३. २)श्री.दिपक पोपटराव कळंबे.येवला (नाशिक).संपर्क-९७३०५६७५४३ Email Id:- dhorsamaj@gmail.com / kakkayasamaj@gmail.com

4

कक्केरी निवासी महाप्रसादी श्री संत वीरशैव कक्कय्या महाराज

श्री कक्कया स्वामी गुरुराज वर्यम । वीरशैव धर्म हितस्य दक्षम ॥

कक्करी क्षेत्र निवासीनम त्वम । नमामी अनुभवमन्टपम वरिश्टम ॥

शरण कार्य कल्पद्रुम गुरु सार्वभौम । श्री कक्केरीधीराज महाप्रसादी ॥


Click here(नाव नोंदणी सुरू आहे.​)

Thursday, 14 June 2012

नाव नोंदणी सुरू आहे.​

वीरशैव कक्कय्या ढोर समाज विवाह संबंधीत वेबसाईट.
नाव नोंदणी सुरू आहे.​


Dipak Popatrao Kalambe.
9730567543

Sunday, 20 May 2012

अंध दांपत्याच्या पोटी जन्मला उजेड!

ऐन उमेदीच्या वयात मला अंधत्व आलं... आयुष्याला जो जोडीदार लाभला तोही "समदृष्टी'चा... म्हणजे माझ्यासारखाच अंध! परिस्थिती बिकट होती; पण जगणं मात्र पुढं जात होतं...निसर्गही थांबला नव्हता...आमच्या अंधारल्या वाटेवर उजेडाचा एक किरण जन्माला आला...नचिकेत त्याचं नाव. त्याला वाढवताना आम्ही जो संघर्ष केला तो अचाट असला, तरी अटळ होता. त्याच्यावर "डोळस'पणानं केलेल्या संस्कारांमुळं आता तो आम्हा आंधळ्यांची आई बनलाय...!' अंजली नारायणे बोलत होत्या नि डोळसांच्या दुनियेतील "दृष्टिहीनत्व' प्रकर्षानं जाणवंत होतं...
नाशिकच्या काठे गल्ली भागातील लिफ्ट नसलेल्या एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर संदेश आणि अंजली नारायणे हे दांपत्य राहतं. दोघंही अंध. अंजली गुजराथी घरातली, तर संदेश मराठी. अहमदाबादमध्ये फिजिओथेरपीचं शिक्षण घेत असताना दोघांची ओळख झाली. पुढं 2001 मध्ये तिचं रूपांतर विवाहात झालं. दोघं नाशकात फिजिओथेरपीचा व्यवसाय चालवू लागले; पण त्यात चरितार्थ भागेना, मग वेगवेगळ्या परीक्षा देत राहिले. त्यातूनच बडोदा बॅंकेत आधी अंजलीला आणि पुढं संदेशला नोकरी मिळाली.

अश्रूंना मानलं शत्रू
जगण्याची लढाई अन्‌ निसर्गाचं चक्र एकाच वेळी पुढं जात होतं. ज्या निसर्गानं अंधत्व दिलं, त्यानंच मातृत्वही दिलं. गर्भवती असताना सर्वसामान्य स्त्रीप्रमाणंच पोटातल्या बाळाच्या हालचाली जाणवायच्या. मातृत्वाची सुखद जाणीव व्हायची. यथावकाश मी एका बाळाला जन्म दिला. डॉक्‍टरांना विचारलं, "बाळ सगळीकडं पाहतंय ना..? त्याला नीट दिसतंय ना..?' तो सगळं टकमक पाहात असल्याचं डॉक्‍टरांनी सांगितल्यावर आनंदाला पारावार उरला नाही; पण मातृत्व लाभल्याचं सुख अनुभवतानाच आता या बाळाला वाढवायचं कसं? या चिंतेचं काहूरही मनात उठलं... संदेशची आई- माझ्या सासूबाई-मदतीसाठी धावून आल्या. बाळंतपणानंतर महिनाभरानं त्याही परत गेल्या. त्या घरातून गेल्या अन्‌ झोळीत झोपलेलं बाळ थोड्या वेळानं उठलं. झोळीतून त्याला काढताना पलंगाची दांडी त्याला लागली. त्यानं हंबरडा फोडला. आम्हा दोघांनाही दिसत नसल्यानं बाळाला काय झालं, हे समजण्याचा प्रश्‍नच नव्हता. मन सैरभैर झालं...डोळ्यापुढंचा अंधार दसपटीनं वाढल्यासारखं वाटू लागलं...बाळाला छातीला लावलं अन्‌ आतल्या खोलीत जाऊन ढसढसा रडले. काही वेळानं भानावर आले. बाळाच्या आयुष्यात उजेड पेरण्यासाठी मला अंधाराला कवटाळून चालणार नव्हतं. मनाशी निर्धार केला...हे रडणं शेवटचंच! असहाय्यतेच्या अशा अश्रूंना इथून पुढं शत्रू मानायचं... त्यांना जवळ फिरकूही द्यायचं नाही. त्यासाठी "मला खंबीर बनव', अशी ईश्‍वराला प्रार्थनाही केली. त्या क्षणापासून आजपर्यंत जवळपास दहा वर्षं झाली... आम्ही मागं वळून पाहिलं नाही...

संगोपनाचं आव्हान
बाळाचं नाव आम्ही नचिकेत ठेवलं. सासूबाई माघारी गेल्यावरच मी बाळाला घेऊ लागले. तोपर्यंत सगळ्या गोष्टी त्याच करीत असत. एके दिवशी बाळाला आंघोळ घालू लागले; पण मी ओतत असलेलं पाणी त्याच्या नाका-तोंडात जात होतं. बाळाचा आवाज येईना, तेव्हा मला याची जाणीव झाली. त्याला पालथं करून पाणी काढलं... या आणि अशा प्रसंगातून त्याला सांभाळण्याची एक पद्धत ठरवून घेतली. बाळानं शी-शू केल्यावर त्याची स्वच्छता करता यावी, म्हणून त्याला लंगोट बांधलेला असायचा. शू केल्याचा वास येताच आम्ही त्याचा लंगोट बदलायचो. शीसाठी एक वेळ मी ठरवून घेतली होती. त्या वेळेत त्याला मी संडासमध्ये न्यायची. शीचा वास येताच लंगोट काढून त्याला स्वच्छ करायची आणि दुसरा लंगोट बांधायची. कपड्यांच्या रंगांचा विषयच नव्हता. त्यामुळं शर्ट-पॅंटची वेगवेगळी बटनं मी स्पर्शानं ध्यानात ठेवायची. अंदाजानं साऱ्या गोष्टी करत असे. त्याच्यासाठी स्वतःच पेज तयार केली. घाटा बनवला. फळांचा रस काढला. हातावर केळांचा कुस्करा केला. बाळाला भरवताना चमचा वापरला नाही. स्वतःचं एक बोटं बाळाच्या ओठाच्या कडेला ठेवून दुसऱ्या हातानं त्याला भरवत असे. बाळाच्या गळ्याभोवती कापड बांधायची; जेणेकरून त्याच्या कानात पेज, रस जाऊ नये. नचिकेत सात-आठ महिन्यांचा असताना त्याला भरवण्यासाठी चमचा घेतला होता. तो माझ्या हातून पडला. नचिकेत दुडदुडत गेला आणि त्यानं माझ्या हातात चमचा आणून दिला. तेव्हा आनंदाश्रूंनी भरलेले डोळे बाळाची प्रतिमा मनोमन अनुभवत होते...!

डोळस बाळाला "घडवताना'च्या संघर्षाची कहाणी अंजली यांच्या शब्दांतून पाझरत होती. नचिकेत अडीच वर्षांचा असताना त्याला नाणी-नोटांची ओळख करून दिल्याचं सांगून त्या म्हणाल्या, ""पुढे नचिकेत "आई' म्हणू लागला. आमचं बोट धरून चालू लागला. आता तो साडेनऊ वर्षांचा झालाय..."आनंदनिकेतन'मध्ये चौथीत शिकतोय...आई-वडील म्हणून त्याचा सांभाळ करतानाच त्याला संस्कार मिळावे, म्हणून मी आजही त्याच्या कानाजवळ रामरक्षा म्हणते. तो स्वतः धार्मिक पुस्तकं वाचून दाखवतो. पोळ्या भाजायला मदत करतो. तांदूळ निवडून देतो. रोजची भाजी चिरतो, दूध आणतो. बाजारात खरेदीला गेल्यावर कपड्यांचे रंग, भाजीपाला, दुकानातल्या वस्तू कशा आहेत, हेही सांगतो.''

"आता नचिकेतला काय करायचं ठरवलं आहे,' असा प्रश्‍न स्वाभाविकपणं मनात आला. त्याचंही उत्तर अंजली यांनी कुठल्याही मातेला अभिमान वाटावं असंच दिलं. त्या म्हणाल्या, ""नचिकेत चांगला नागरिक व्हावा, यासाठीच आमची यापुढची सारी धडपड राहील...नचिकेतनं मला मातृत्व दिलंय खरं; पण आता नचिकेतच आमची आई झालाय...! पूर्वी तो आमच्या बोटाला धरून चालायचा...आता आम्ही दोघं त्याच्या बोटाला धरून चालतोय..!''
अंजली आणि संदेशच्या अंधाऱ्या, संघर्षमय वाटेवर पडलेला उजेडाचा कवडसा मोठा होतो आहे. अंजलीच्या तोंडून हे सारं ऐकताना कधीकाळी तिच्या मनात दाटलेल्या अगतिकतेची जागा आज अभिमानानं घेतलीय, हे जाणवंत होतं...

घुंगरं बोलायची...!
"अनिकेत दीड वर्षाचा असताना खेळता खेळता घराबाहेर गेला. बराच वेळ झाला तरी तो आला नाही. मला वाटलं गच्चीवर गेला असेल. मी तिकडं धावले. गच्चीचा प्रत्येक कोपरा, सगळा कठडा चाचपून पाहिला; पण तो सापडला नाही. गल्लीतही शोध घेतला. आमची धावाधाव शेजारच्या काकूंच्या कानावर गेली. अनिकेत त्यांच्या घरात खेळत होता. त्यांनी त्याला माझ्याकडं दिलं आणि अक्षरशः माझा जीव भांड्यात पडला. तेव्हापासून घराचा दरवाजा आम्ही उघडा ठेवत नाही. अनिकेतच्या पायातील पैंजणाची घुंगरं मला त्याच्या हालचालींची जाणीव करून द्यायची. त्याच्या भावना, संवेदना मला घुंगरांच्या आवाजातूनच कळायच्या. त्या आवाजाकडंच माझे कान असायचे...अंधार वाट्याला आला असताना एखादं बाळ वाढवणं किती सत्त्वपरीक्षा पाहणारं असतं, हे "जावे त्यांच्या वंशा' तेव्हाच कळे...'' अंजली नेमक्‍या शब्दांत सांगत होत्या; पण त्यांच्या आवाजातला कंप परिस्थितीशी केलेला संघर्ष प्रतिध्वनित करीत होता.
फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश

अकोला - "अपने लिये जिये तो क्‍या जिये, तू जिऐ दिल जमाने के लिये' हिंदी चित्रपटातील या गाण्याच्या ओळीप्रमाणेच नाशिकच्या एका दाम्पत्याने अंधांचे जीवन प्रकाशमान करण्याचा चंग बांधला आहे आणि तोही स्वतः अंध असताना.

मुंबईच्या कुर्ला भागात राहणारा संदेश नारायणे हा जन्मत:च, तर नाशिकमध्ये राहणारी अंजली गुजराती ही वयाच्या 25 वर्षी आनुवंशिक कारणामुळे अंध झाली होती. गुजरातमधील अहमदाबादेत अंधांसाठी असलेल्या संस्थेत शिकताना दोघांची ओळख, ओळखीचे मैत्रीत व अपेक्षेप्रमाणे मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. तत्पूर्वीच संदेश नारायणे यांनी मुबई विद्यापीठातून एम. ए. (मानसशास्त्र) पूर्ण केले होते, तर अंजलीदेखील वाणिज्य शाखेची पदवीधर होती. नंतरच्या काळात अहमदाबादेतील संस्थेत दोघांनीही ध्वनिसंदेशाच्या माध्यमातून संगणक हाताळणीचे प्रशिक्षण पूर्ण केले. "फिजियोथेरपी' हा वैद्यकीय अभ्यासक्रम संदेशने पूर्ण केला. नुसता पूर्णच नाही, तर त्या बॅचचा तो "टॉपर' ठरत त्याला सुवर्णपदकही मिळाले. अंजली व संदेश या दोघांनी एक जुलै 2001 मध्ये वैदिक पद्धतीने विवाह केला. त्यानंतर इतरांवर ओझे बनून न राहता दोघांनी नाशिक जवळ करीत तेथे स्वतःकडील व मित्रांच्या सहकार्यातून द्वारकास्थित हरिकृपा सोसायटीत छोटेसे घर घेतले. दैनंदिन गरजा भागविण्यासाठी लागणाऱ्या रकमेची जुळवाजुळव संदेश "फिजियोथेरपी'च्या माध्यमातून करू लागला. त्यानंतर कोणावरही अवलंबून न राहता या दोघांचा संसार सुरू झाला. 2002 मध्ये त्यांच्या संसारवेलीवर नचिकेत नावाचे फूलही उमलले. नचिकेतच्या आगमनामुळे दोघांना जगण्याचे बळ मिळाले. याच काळात "बॅंक ऑफ बडोदा'ने अंध, अपंगांसाठी भरती मोहीम राबविली. त्यात संदेश व अंजली या दोघांची शैक्षणिक गुणवत्तेच्या बळावर अधिकारीपदावर वर्णी लागली. संदेश नाशिक येथील सातपूर शाखेत, तर अंजली शरणापूर येथील शाखेत आहेत. बॅंकेत येणाऱ्या अंध व डोळसांना मार्गदर्शन करणे हा दोघांचा नित्यक्रम. त्यासोबतच घरी येणाऱ्या गरजूंसाठीही ते आधारवडाची भूमिका वठवितात. दोघेही अधिकारीपदाचा बडेजाव न करता राज्यभरातील अंधांना समुपदेशन करीत दिशादर्शकाची भूमिका वठवितात. ई-मेल, मोबाईलद्वारे मार्गदर्शनाचा वसा त्यांनी जपला. अंधांविषयी असलेले शैक्षणिक, व्यावसायिक अभ्यासक्रमांची माहिती देण्याचे काम ते नोकरी सांभाळून करतात. अंजलीप्रमाणेच समाज व परिवाराविरोधात बंडाचा झेंडा तिची बहीण वृषाली हिनेदेखील फडकाविला. वृषालीदेखील अंध असून, ती एम. एस. डब्ल्यू. पर्यंत शिकली. मात्र, समाजातील कोणीही अंध मुलीला स्वीकारण्यास तयार नसल्याने मनाने डोळस असलेल्या मुस्लिम समाजातील एका युवकाशी तिने विवाह केला. नाशिकमध्ये ती आज जाहिरात एजन्सीचा व्यवसाय करते. "विरंगुळा' या संस्थेच्या वतीने अकोल्यात संदेश व अंजलीच्या मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. 

Thursday, 10 May 2012

वीरशैव शिवप्रसादी संत कक्कया महाराजांच्या जीवन चारित्र्यावर आधारित चित्रपट होण्यासाठी कृपया आपली मदत बहुमुल्य आहे ....

Thursday, 3 May 2012

ज्यांच्यशिवाय चालणेही अशक्य झाले असते...ढोर समाजाचा इतिहास .


हा भारतातील एक अत्यल्पसंख्य समाज आहे. हा समाज मुख्यत: महाराष्ट, कर्नाटक अल्पांश स्वरुपात गुजरातेत आढळतो. अन्यत्र कातडी कमावणा-या समाजांना वेगवेगळी नांवे आहेत. जशी उत्तरेत मोची, चमार वगैरे. त्याचे कारण असे आहे कि ज्या ज्या भागांवर सातवाहनांनी राज्य केले तेथे तेथे माहाराष्ट्री प्राक्रुत भाषेचा प्रभाव असल्याने त्या भागांतील जातींची नांवे हे माहराष्ट्री प्राक्रुतावरुन फडलेली आहेत. अन्यत्रच्य जातीनामांवर त्या-त्या प्रदेशातील भाषांचा प्रभाव असला तरी हा समाज मुळचा एकच. चर्मकार समाजही याच समाजातुन विशिष्ट कौशल्यामुळे वेगळा झाला एवढेच!

नामोत्पत्ती:

ढोर हा शब्द मुळात जनावरांसाठीचा नाही हे माहाराष्ट्री प्राक्रुतावरुन स्पष्ट दिसुन येते. मुळ शब्द "डहर" असा असुन त्याचा अर्थ पानवठे, डोह, तळी यानजीक व्यवसाय करणारे लोक असा आहे. आणि ढोर समाजाचा पुरातन कातडी कमवायचा व्यवसाय पाहता त्यासाठी विपुल प्रमाणात पाण्याची असलेली गरज पाहता त्यांचा व्यवसाय हा मुबलक पाणी उपलब्ध असलेल्या ठिकाणीच स्तिरावला असनेही सहज स्वाभाविक आहे. "डह" हा शब्द पुढे "डोह" (पाण्याचा) बनला डोहरचे कालौघात बदललेले रुप म्हनजे "ढोर" हे होय. (आजही ग्रामीण भागात डोहाला "डव्ह वा ढव" असेच संबोधतात.) गुरे डोहांत अपरिहार्यपणे जातातच म्हणुन जातात म्हणुन गुरे-ढोरे हा शब्द प्रचलित झाला जणु काही ढोर म्हनजे जनावरे असा चुकीचा अर्थ प्रचलित झाल्याचे स्पष्ट दिसते. यातुनच ढोर समाजाला हा शब्द अवहेलनात्मक अर्थाने वापरला गेल्याचे समज असल्याचे दिसुन येते...पण ते मुळ वास्तव नाही. डोहानिकट (वा जलाशयानिकट) व्यवसाय करणारे ते डोहर तथा ढोर होत. या समाजाचे मानवी इतिहासात अत्यंत मोलाचे स्थान आहे. या समाजाने अठराव्या शतकातील औद्योगिक क्रांतीपर्यंत पुरातन काळापासुन मानवी जीवन, युद्धशास्त्र, प्रवास एकुणातील अर्थव्यवस्थाही सम्रुद्ध करण्यात मोलाची कामगिरी केली आहे हे पुढे सिद्ध होईलच, पण भारतीय समाजातील वैदिक व्यवस्थेने त्यांच्याबद्दल क्रुतद्न्य राहता त्यांनाच अस्प्रुष्य ठरवत क्रुतघ्नताच व्यक्त केली आहे असे स्पष्ट दिसते.

प्राचीन इतिहास:

भारतात जाती या व्यवसायावरुन पडतात ही परंपरा आपल्याला माहितच आहे. ढोर समाजाच्या व्यवसाय म्हणजे म्रुत जनावरांच्या कातड्यावर प्रक्रिया करुन ते टिकावु उपयुक्त बनवणे हा होय. हा व्यवसाय किती पुरातन आहे? मुळात मानवाने हा शोध कसा लावला यासाठी आपल्याला इतिहासात डोकावणे गरजेचे आहे. खरे तर हा जगातील पहिला जैव-रसायनी प्रक्रिया उद्योग होय.

जेंव्हा जवळपास दीड लाख वर्षांपुर्वी मानव हा शिकारी मानव होता, भटका होता, नग्न रहात होता, त्या काळात मानवाला शिकार केलेल्या प्राण्यांच्या कातड्याची उपयुक्तता लक्षात आली. थंडी-पावसापासुन रक्षण करण्यासाठी (लज्जा रक्षणासाठी नव्हे...कारण तो विचार तेंव्हा मानवाला शिवलाही नव्हता.) पांघरण्यासाठी क्रुत्रीम निवारे बनवण्यासाठी आपण कातडे वापरु शकतो हे लक्षात आल्यावर मानवाने शिकार केलेल्या प्राण्यांची कातडी जपायला सुरुवात केली. परंतु वातावरणाच्या प्रभावामुळे कातडे फार काळ टिकत नाही हे लक्षात आल्यानंतर माणसाने आपली प्रतिभा कामाला लावुन कातडे टिकावु कसे करता येईल यासाठी शोध सुरु केला. सुरुवातीची हजारो वर्ष प्रथम मानव जनावराचीच चरबी चोळुन कातड्याला मऊ टिकावु ठेवण्याचा प्रयत्न करत होता. त्या काळी विपुल शिकार उपलब्ध असल्याने तशी कातड्याची कमतरताही नव्हती. शिवाय तत्कालीन मानव सतत शिकारीच्या वा चरावु कुरणांच्या शोधात सतत भटकता असल्याने प्रक्रिया पद्धती शोधणे वा प्रक्रिया करत बसणे यासाठी त्याच्याकडे वेळही नव्हता. पण मनुष्य जसा शेतीचा शोध लागल्यावर स्थिरावु लागला शिकार कमी झाल्याने कातड्याची मुबलकता कमी झाली तेंव्हा मात्र कातड्यावर प्रक्रिया केली तरच कातडे दीर्घकाळ टिकावू करता येईल हे त्याच्या लक्षात आले.

सरासरी इसवी सनाच्या दहा हजार वर्षांपुर्वी, म्हनजे जेंव्हा या वैदिक धर्माचा उदयही झाला नव्हता, तेंव्हा असंख्य प्रयोग करत त्याने नैसर्गिक वनस्पतीजन्य पदार्थ वापरत अभिनव पद्धती शोधुन काढली... ती म्हणजे कातडी कमावण्याची कला. भारतात बाभुळ, खैर अशा झाडांच्या साली, चुना, मीठ अन्य तेलादि रंजक द्रव्ये वापरत कातडी कमावण्याची, रंगवण्याची पद्धत इसवी सनापुर्वी सात हजार वर्षांपुर्वीच शोधण्यात आली. प्रचारित होवून ती भारतभर एक-दोन शतकातच देशभर पसरत वापरात आली. (युरोपात मात्र ओक व्रुक्षाची साल वापरली जाई ते कातडे तेवढे टिकावुही नसे.)

कातडी कमावणे हे अत्यंत शिस्तबद्ध रासायनिक प्रक्रियांची एक विशिष्ट श्रुंखला असलेले किचकट कष्टदायी काम आहे. आज या उद्योगात अनेक प्रक्रिया यांत्रिकीकरणाने होत असल्या तरी प्राथमिक प्रक्रिया या मानवी कष्टांशिवाय होत नाहीत. प्राचीन काळाचा विचार केला तर मग हे काम एके वेळीस रासायनिक प्रक्रिया वेळोवेळी करण्याची, रासायनिक प्रक्रियांसाठी लागणारी नैसर्गिक जैव सामग्री गोळा करण्याची अंतत: त्याला अंतिम उत्पादनाचे रुप देण्याची कारागिरी करण्यास किती सायास पडत असतील याची आपण कल्पना करुनच थक्क होतो.

आता येथे कोणी प्रश्न विचारु शकतो कि मुळात ही यातायात का? एक तर जनावराचे कातडे सोलुन काढले कि ते वाहुन आपल्या उद्योगस्थळापर्यंत वाहुन नेण्याचा, वरकरणी घाण वाटनारा उपद्व्याप...मग एवढ्या रसायनी प्रक्रिया करतांना येणारा उग्र घाणेरडा वास, चुन्याची-मीठाची प्रक्रिया करतांना हात-पायांवर होणारे परिणाम...हे सारे सहन करत का केला? दुसरा प्रश्न असा कि खुद्द गावाच्या वेशीआत हा उद्योग, अगदी समजा प्राथमिक प्रक्रिया डोह वा अन्य जलाशयांजवळ केल्या, तरी उर्वरीत प्रक्रिया वेशीआत कोणी करु देणे शक्य नव्हते, कारण तरीही वास प्रक्रिया पुर्ण झाल्याखेरीज जात नाही. त्यामुळे त्यांना आपली वसतीही आपल्या उद्योगस्थानानिकट ठेवणे भाग पडले. याचे कारण म्हणजे मुलात या व्यवसायाखेरीज मानवी जीवन सुसह्य होवूच शकत नव्हते. मग तरीही हा उद्योग यांनी सुरु का ठेवला? कारण नसतांना अस्प्रुष्यतेचा कलंक का माथी मारुन घेतला? हा उद्योग तसा जगभर असला तरी तिकडे अशी अमानवी वागणुक या उद्योगातील लोकांना दिली गेल्याचे एकही उदाहरण मिळत नाही.

या उद्योगाचे मानवी जीवनाला नेमके काय योगदान आहे हे प्रथम आपण पाहुयात, त्याशिवाय ढोर समाजाचे महत्व समजणार नाही. कातडी कमावल्यामुळे (विविध प्राण्यांची कातडी कमावण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापराव्या लागतात.) घॊड्यांचे जीन, बैलगाडीसाठी बैलांच्या टिकावु मजबुत वाद्या बनवता आल्या. सैनिकांसाठी शिरस्त्राने, हस्त-बचावक, चामडी चिलखते, ढाली बनवता येवू लागली युद्धतंत्रात मोठा बदल झाला. लिखित संदेश पाठवण्यासाठी अगदी ग्रंथ लेखनासाठी कातड्याचा वापर होवू शकला. (अशा हजारो चामड्यावर लिहिलेल्या ज्यु धर्माच्या लेखनाच्या गुंडाळ्या तेल अमार्ना येथे सापडल्या आहेत.) एके काळी तर चामड्याचे तुकडे हे चलन म्हणुनही वापरात होते. यामुळेच सर्वांसाठी पादत्राणे उपलब्ध होवू शकली. शेतीसाठीच्या अनेक अवजारे ते जलस्त्रोतासाठी लागणा-या मोटी बनु लागल्या. शेती उत्पादन वाढले. फ्यशनमद्धे आजही कातडी वस्तु प्रचंड मागणीत असतात. अगदी ग्रंथांच्या बांधणीतही कातड्याचा उपयोग केला जात असे. पाण्याच्या पखाली, तेलाचे बुधले (ढोर समाजात यातही स्पेश्यलिस्ट असणारी पोटजात आहे तिला "बुधलेकरी" म्हनतात.) कमावलेल्या चामड्यापासुनच बनत होते. अशी असंख्य उदाहरणे देता येतील. पण या चर्म-वस्तुंचा सर्रास उपयोग करणा-यांनी मात्र ज्यांनी मुळात हे बनवले ज्यांनी (चर्मकारांनी) त्यापासुन आपल्या कलेचे दर्शन घडवत मानवोपयोगी वस्तु बनवल्या, त्यांना मात्र अस्प्रुष्य ठरवले. मेलेल्या जनावराच्या चामड्याची पादत्राणे वापरतांना, मंदिरांत वा संगीतात रममाण होतांना चर्मवाद्यांचाच प्रामुख्याने वापर करतांना, अश्वारोहन करतांना त्या चामड्याच्या वाद्या हातात धरतांना, चामड्याचे कंबरपट्टे वापरतांना, कातड्याच्याच पखालींतील पाणी पितांना वा चामड्याच्याच बुधल्यांतील तेल खाण्यात वापरतांना कोणालाही शरम वाटली नाही...पण...असो.

तर हा समाज आद्य जैव-रसायनी प्रक्रियेचा शोध लावत मानवी जीवनात अत्यंत मोलाचा हातभार लावणारा, भारतीय अर्थव्यवस्थेलाही पुरातन काळापासुन हातभार लावणारा समाज आहे. उदा. सिंधु संस्क्रुतीतुन निर्यात होणा-या मालात मीठ कातडी वस्तुंचे नंतर मणी-अलंकारांचे फार मोठे प्रमाण होते. ढोर समाजातुनच चर्मकार समाजाची उत्पत्ती झालेली आहे हे महाराष्ट्रीय समाजेतिहासावरुन स्पष्ट दिसुन येते. आजही भारत प्रक्रिया केलेली कातडी निर्यात करणारा जगातील तिस-या क्रमांकाचा देश आहे हेही येथे लक्षात घ्यायला हवे. फक्त आता याच मुळ समाजाचा - ज्याने या सर्वच प्रक्रियेचा आद्य शोध लावला त्याचा स्वत:चा वाटा घटलेला आहे...कारण औद्योगिकरण त्यासाठी लागणा-या या समाजाकडे असलेला भांडवलाचा अभाव.

१८५७ पासुन जसे याही क्षेत्रात औद्योगिकरण आले तसे मात्र क्रमश: या समाजाचे महत्व कमी होवू लागले. गांवोगांवी हिंडुन कातडी विकत घेत चर्मप्रक्रिया करणा-या कारखान्यांना पुरवणा-यांची संख्या वाढली. त्यामुळे या स्थानिक, कुटीरौद्योगावर अवकळा यायला लागली. त्यात जन्मजात अस्प्रुष्यता लादलेली असल्याने स्वातंत्र्योत्तर काळात ही मंडळी भान येवून या व्यवसायापासुन फटकुन रहायला लागली. नवे रोजगार, तेही मिळाल्यास अगदी शेतमजुरीही करु लागली. मुळात हा समाज पुरेपुर शैव. यांच्यातही मात्रुसत्ता पद्धती सर्रास आहे. या समाजातच ककय्या या महान वीरशैव संताचा फार मोठा प्रभाव असुन महाराष्ट्रातीलही असंख्य समाजिय स्वत:ला ककय्या मानतात...किंबहुना हीच फार मोठी पोटजात बनलेली आहे. या मुळ डहर (ढोर) शैवजनांची लोकसंख्या भारतात २००१ च्या जनगणनेनुसार सुमारे ८२ हजार होती...आता ती सव्वा ते दीड लाख एवढी असेल. या समाजातुन आता अनेक विद्वान, शास्त्रद्न्य ते संगणक तद्न्य पुढे येवू लागले आहेत. राजकारणात म्हणावे तर सुशिलकुमार शिंदे त्यांची कन्या देशप्रसिद्ध आहेतच. याचाच अर्थ असा कि या समाजाने आपला व्यवसाय जरी आधुनिकिकरणाने हिरावला असला तरी जिद्द सोडलेली नाही. खरे तर सुशीलकुमार शिंदेंनी आपल्या समाजासाठी खुप काही करायला हवे होते अशी अपेक्षा असायला हरकत नाही...पण याचा दुसरा अर्थ असाही आहे कि त्यांनी स्वजातीयांचाच, अन्य नेते पाहतात, त्याप्रमाणे स्वार्थ पाहिला नाही.

असो. जेही पायात प्रथम बाहेर जातांना चपला-जोडे घालतात, चामडी वस्तुंचा (जसा अमेरिकन लोकांना मिंक कोट घालण्यासाठीचा महाभयंकर शौक आहे) हव्यास बाळगतात...ज्यावर आपली सभ्यता श्रीमंती ठरवतात, त्यांनी लक्षात घ्यावे कि हे सारे उपकार डहर उर्फ ढोर समाजाचे आहेत. जेथे स्वत:ला पवित्र समजणारे ऋषि-मुनी (अगदी आजचे बाबा-बुवाही) सिंह ते म्रुगाजीनावर (याच व्यावसायिकांनी कमावलेल्या चर्मावर) बसुन जगाला उपदेश करत असत तेही याच समाजाचे ऋणी असले पाहिजेत. ते चर्म मात्र स्पर्श्य होते...आणि ते बनवणारे कलाकार-उद्योजक मात्र अस्पर्श्य, असे कसे बरे?

-संजय सोनवणी (Sanjay Sonawani).
हा लेख माझा नसून श्री.संजय सोनवणीसाहेब (Sanjay Sonawani) याचा आहे. याचे सर्व श्रेय हे श्री.संजय सोनवणीसाहेब याचे आहे. माझे नाही.

किती लोक हा ब्लॉग वाचतात पहा. माझ्या संकेतस्थळाला वाचकांनी दिलेल्या भेटी.

आपणास वीरशैव कक्कय्या (ढोर) समाज या ब्लॉगची विस्तृत माहिती मिळण्याचे माध्यम कोणते?